मुंबई: मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा फैसला आता 18 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. सचिन वाझे याच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असून त्याने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनासाठी अर्ज केला आहे. ईडीने सचिन वाझेच्या जामीनाला विरोध केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे याच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणात वाझेला अटक करण्यात आलेली नाही असं सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली. सचिन वाझे हा पुराव्यांशी छेडछाड करू शकतो अशी चिंता तपासयंत्रणेनं व्यक्त केली असून त्याच्या जामीनाला विरोध केला आहे.
सचिन वाझे माफीचा साक्षीदार
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आलं आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.
आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.
सचिन वाझे सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. या बरोबरच भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथिक कोठडी मृत्यू प्रकरणातही वाझे आरोपी आहे.
महत्त्वाची बातमी: