CM Eknath Shinde On MVA March: मुंबईत आज महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत मविआच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde ) यांनी मविआला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चारोळीच्या स्टाईलमध्ये बोलताना 'काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे मोर्चा काढतात, असं शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तीच तीच भाषणं आपण पाहिली.  आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. मुंबईत भगव्या झेंड्या पेक्षा इतर झेंडे दिसले. शिवसैनिक त्याचमुळे प्रवेश करत आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत


मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार भक्कम सरकार आहे.  ते डबल इंजिन सरकार आहे.  2 लाख कोटी विकासासाठी दिलेले आहेत.  कोणी म्हणाले एक महिन्यात हे सरकार पडेल आता पाच महिने झाले. हे सरकार मजबूत आहे.  लफंगे कोण आहे? लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे.  खुर्ची मिळवण्यासाठी आणि बाळासाहेबाचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वांनी पाहिले आहे.  जे आपल्या हिंदू देवतांचा अपमान करतात ते देखील त्यांच्या व्यासपीठावर होते, हे आपले दुर्दैव आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्री म्हणाले की, काल नाशिकमधील नगरसेवक पक्षात दाखल झाले. आज देखील शिवसैनिक आले आहेत. आमच्यावर विश्वास दाखवला आहे, या सर्वांना न्याय देण्याचे काम होईल. या सरकारने जे काम केले आणि निर्णय घेत आहेत त्याचा हा परिणाम आहे. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झाले आहे. विकास हाच आमचा उद्देश आहे. कालची आमची कोकणची सभा मोठी होती, आजची त्यांनी संख्या सांगावी, असा टोला त्यांनी लगावला.


अभिनेता सुशांत शेलारचा शिंदे गटात प्रवेश (Actor Sushant Shelar in Shinde Group)


यावेळी अभिनेता सुशांत शेलारनं शिंदे गटात प्रवेश केला. तो म्हणाला की, एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, सचिव पदी नियुक्ती झाली आहे. मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. वरळी या मतदार संघात बाल शिवसैनिक म्हणून काम केलंय.  मला मुख्य प्रवाहात काम करायची इच्छा होती, त्यामुळे इथे आलो. प्रत्येक जण संधीच्या शोधात असतो, त्याला काम करायला टॅलेंट दाखवायला वाव आहे तिथे जातो. विकास कामं , पक्ष विस्तार करण्याची इच्छा प्रत्येकाची असते, असंही तो म्हणाला. 


ही बातमी देखील वाचा


जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर