मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही आज (मंगळवार) तुफान फटकेबाजी केली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या अनेक प्रश्नांना खास शैलीत उत्तरं दिली.


संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत जशीच्या तशी :

संजय राऊत : सुरु करायचं का?

मुख्यमंत्री : हो... फक्त लोकांना सांगा की हा ‘सामना’ नाही.

संजय राऊत : संजय राऊत आपली मुलाखत घेणार हे कळल्यावर पहिला विचार काय आला?

मुख्यमंत्री : राज ठाकरे आणि पवारांच्या पार्श्व भूमीवर ही मुलाखत करायची की नाही असं आधी मनात आलं. पण म्हटलं की चला करुयात... आवडेल.

संजय राऊत : तुम्ही सामना वाचत नाही, असं तुम्ही नेहमी म्हणता

मुख्यमंत्री : जे बोलतो ते खरं मानू नका

संजय राऊत :  सामना चोरुन वाचता का हे मी विचारणार नाही पण अमृता वहिनी आवडीने वाचतात.

मुख्यमंत्री : दिल्लीत पत्रकार सामना खूप वाचतात,  कारण सामना त्यांना ब्रेकिंग न्यूज देत असते.

संजय राऊत : संघात काय होणार हे तुम्ही सांगू शकता का?

मुख्यमंत्री : नाही... संघाची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यामध्ये मी ढवळाढवळ करत नाही.

संजय राऊत : मग शिवसेनेत काय होणार आहे हे कसं सांगू शकता?

मुख्यमंत्री : कारण तो राजकीय पक्ष आहे. त्यांचे काय डावपेच असू शकतात हे ओळखता येतं.

संजय राऊत : आम्ही स्वबळावर लढणार आहोत हे सांगितल्यानंतर तुम्हाला कसं कळतं की युती होईल?

मुख्यमंत्री : शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदुत्त्वाच्या विचारांसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष एकत्र येईल

संजय राऊत : मग हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना २०१४ला ही होती. तेव्हा युती का तोडली?

मुख्यमंत्री : तेव्हा जागा वाटपांवर चर्चा फिस्कटली तुम्ही त्या चर्चेला नव्हता.

संजय राऊत : युतीचं सरकार असताना रिमोट कंट्रोल बाळासाहेबांकडे होता आता तुमचा कंट्रोल कोणाकडे आहे?

मुख्यमंत्री : मला आवडलं असतं की माझा कंट्रोल बाळासाहेबांकडे असता तर. पण आमच्या पक्षात तसं काही नाही. अमित शाह किंवा पंतप्रधान मोदी कधीच हस्तक्षेप करत नाहीत.

संजय राऊत : तुमच्या काळात शेतकरी संपावर गेले? हे चित्र काही बरं नाही.

मुख्यमंत्री : परिवर्तन एका दिवसात होत नाही.. सिंचन क्षमता केवळ 18%. आम्ही आलो तेव्हा 20 हजार गावात दुष्काळ.. याने व्यथित झालो नाही.. जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त उत्पादन गेल्या वर्षी झालं.

संजय राऊत : आज सकाळी विदर्भात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आपण किती जणांना कर्जमाफी दिली याची माहिती तुमच्याकडे नाही.

मुख्यमंत्री : तुम्ही दिल्लीत जास्त राहता, महाराष्ट्रात काय चाललंय हे तुम्हाला माहीत नाही. पेन ड्राईव्हमध्ये माहिती दिली आहे. एकूण एक कर्जमाफ केलेल्या शेतकऱ्यांची माहिती पारदर्शकपणे देऊ शकतो.

संजय राऊत : भीमा-कोरेगाव पेटत होता आणि आपण बघत होता कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

मुख्यमंत्री : ही घटना वाईट आहे. एवढ्या कमी जागेत ८ लाख लोक एकत्र आले पण कोण जखमीझालं नाही. इतर घटनांच्या तुलनेत त्याचा कमी परिणाम दिसला.

संजय राऊत : तुमच्या पक्षात गुंड येतात आणि पवित्र होतात?

मुख्यमंत्री : असा कुठला पक्ष नाही ज्यात गुंड आहेत?, आपण सर्वांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे की गुंडाना नाही घ्यायला पाहिजे. अपवादाने आमच्यातही गुंड आहे पण लोकांनीही आत्मपरिक्षण केलं पाहिजे. की, या गुंडाना जनता निवडून देते.

संजय राऊत : २०१९चं चित्र कसं बघतां?

मुख्यमंत्री : देशात मोदी, भाजप आणि एनडीएचं सरकार असेल

संजय राऊत : महाराष्ट्राची जनता 2014 पासून बैलगाडी शोधते आहे. पण अजून ती बैलगाडी सापडत नाही?

मुख्यमंत्री : बैलगाडीपेक्षा जास्त पुरावे जमा झाले आहेत. ट्रकभर पुरावे झाले आहेत. आतापर्यंत 21 एफआयआर दाखल झाले आहेत. यावरुन एक सिद्ध होतं की, काही प्रमाणात अनागोंदी माजली होती.

संजय राऊत : भुजबळांच्या बाजूच्या काही कोठड्या रिकाम्या आहेत. त्या कधी भरतील?

मुख्यमंत्री : त्या भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याची काळजी करु नका.

संजय राऊत : आपल्या किंवा अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?

मुख्यमंत्री : तुम्ही दिल्लीत राहता, परदेशी गुंतवणूक वाढली आहे गेल्या दोन वर्षात काळा पैसा परत आणला आहे. त्यामुळे देशाच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

संजय राऊत : दिल्लीत जायची इच्छा आहे का?

मुख्यमंत्री : मला पक्षाने उद्या नागपूरला जायला सांगितलं तरी मी जाईन, दिल्लीला जा सांगितलं तरी जाईन जे सांगितलं जाईल ते ऐकणार.

संजय राऊत : नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, युती झाली तर मी बाहेर पडेनं

मुख्यमंत्री : मी ती मुलाखत पाहिली नाही. पण याचं तुम्ही आत्मपरिक्षण करायला पाहिजे. तुम्ही आमच्याशी जर सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना घेण्याची वेळ आली नसती.

VIDEO :



संबंधित बातम्या :
LIVE : संजय राऊतांच्या रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची दिलखुलास उत्तरं