पंढरपूर: पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत.

मुख्यमंत्र्या ‘वर्षावर सपत्नीक पूजा

पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं.

मुख्यमंत्र्यांनी घरी केलेल्या पूजेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी  विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

पंढरपूर, अवघ्या महाराष्ट्राचं माहेर... हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (तालुका-शेणगाव) सौ. वर्षाताई आणि श्री अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज माऊलीची शासकीय महापूजा केली, याचा मला विशेष आनंद आहे. या दाम्पत्याचे मन:पूर्वक अभिनंदन !


24 मे 2017 : राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी आपण लातूरच्या दौऱ्यावर होतो. खरोसा टेकडीवर कीर्तनाचा कार्यक्रम होता. श्री वसंत पाटील या आमच्या कार्यकर्त्याने विठ्ठल-रूख्मिणीची एक मूर्ती मला भेट दिली.


25 मे 2017: काही गावांच्या भेटी आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. सारे काही तुटले. पण, सुखरूप वाचलो अन् सुखरूप राहिली ती ही मूर्ती! मी अंधश्रद्धा मानत नाही. पण, हा तर माऊलीचाच आशिर्वाद होता. तेव्हापासूनच ती मूर्ती माझ्या देवघरात रोजच्या पूजेत आहे.


आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥


राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली. येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥


तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल... गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...

संबंधित बातम्या 

जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर विठूपूजा  

माझ्यावर दगडफेक करुन आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे : मुख्यमंत्री