मुंबई : बहुप्रतिक्षीत मुंबईचा विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी मुंबई डीपी प्लॅन 2034 च्या छाननी समिती अहवालाला हिरवा कंदील दाखवला. समितीकडून या नव्या डीपी प्लॅनची घोषणा आज मंत्रालयात होण्याची शक्यता आहे.


मुंबईचा डीपी प्लॅन खुल्या जागेचं आरक्षण, शाळा आणि बागेचे भूखंड, हेरिटेज वास्तू वगळण्यात येणं, खाजगी भूखंडांवरुन सार्वजनिक रस्ते अशा विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे त्याचा अंतिम आराखडा तयार होण्यास विलंब होत होता.

मुंबई डीपी प्लॅन 2034 ची काही वैशिष्ट्ये :-

मुंबईत परवडणाऱ्या घरांना (Affordable housing) जागा उपलब्ध करण्यासाठी  'नो डेव्हलपमेंट झोन'चं आरक्षण हटवण्यात येणार

मुंबईत कमर्शियल FSI वाढवण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन मिळणार असून रोजगार वाढीसाठी याचा फायदा होईल.

डीपी प्लॅनमध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या प्रत्येक वॉर्डत सामाजिक आरक्षण (Social reservation) ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये वृद्धाश्रमे, महिलांसाठी हॉस्टेल्स, सुलभ शौचालये यासाठी राखीव जागा ठेवण्याचा विचार करण्यात आला आहे.

मुंबईतल्या अनाधिकृत फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता मोबाईल हॉकिंग झोन किंवा फिरते फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्यावर भर असणार आहे. मुंबईतल्या नाईट लाईफला चालना देण्यासाठी हा निर्णय पोषक ठरु शकतो.

मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित आरेमधल्या 33 हेक्टर जागेवरचं 'नो डेव्हलपमेंट झोन' आरक्षण हटवण्यात आलं होतं. मात्र ग्रीन झोनचं आरक्षण सर्वत्र आरेमध्ये कायम ठेवण्याची काही पर्यावरण संस्था आणि शिवसेनेची मागणी होती. मात्र नव्या डीपी प्लॅनमध्ये आरक्षण हटवण्यावर शिक्कामोर्तब झालं असून मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडू शकते.