मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं. 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर जनतेला संबोधित केलं.


राज्यात मागील एक वर्षात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार उपलब्ध झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

"महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी विविध प्रयत्न राज्य सराकरने केले. सरकारने त्यासाठी चांगलं काम केलं आहे. त्याचे दृष्य परिणाम पाहायला मिळाले. गेल्या दोन वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के महाराष्ट्रात आली. त्यासोबत ईपीएफओने संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली, त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रोजगार निर्माण झाले. मागील एक वर्षात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार निर्माण झाले. त्यातून महाराष्ट्राची आगेकूच सुरु आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन, मोर्चे आणि निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व समाज, जाती, धर्मातील सौहार्द टिकला तरच राज्य पुढे जाईल. महाराष्ट्राचं पुरोगामित्व ही मोठी ताकद आहे, आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

यावेळी त्यांनी राज्यातील विकास योजनांचाही पाढा वाचला. राज्यातील 16 हजार गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणीदार केली, हे उद्दिष्ट आता 25 हजार गावांचं असेल. तसंच देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 42 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यामुळे राज्य प्रगतीपथावर आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसंच या माध्यमातून गेल्या एका वर्षात तब्बल 8 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

तर 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवणं अत्यंत गरज आहे. वंचितांना सोबत घेऊन जाण्याला प्राधान्य असेल. समाज, जाती - धर्मात सौहार्द टिकलं तर महाराष्ट्र पुढे जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्र एकसंध राहील यासाठी सर्वांंनी प्रयत्न करु असं आवाहन त्यांनी केलं.