मुंबई : मुंबईच्या काळबादेवी परिसरातील सुवर्णकार कारागिरांचे व्यवसाय अन्यत्र स्थलांतरित करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेला दिली आहे. वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सूचना देण्यात आली आहे.


येत्या तीन महिन्यात ही कारवाई करण्यास महापालिकेला सांगण्यात आलं आहे. मंत्रालयात सोमवारी ऑनलाइन लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी काळबादेवी भागात राहणाऱ्या हरकिशन गोरडिया यांनी या परिसरातील सुवर्ण कारागिरीच्या व्यवसायामुळे आग लागण्याचा धोका असल्याचं सांगितलं. अग्निसुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचीही गोरडिया यांनी तक्रार केली. याची गंभीर दखल घेत फडणवीसांनी महापालिकेला यासंदर्भात पुढील कारवाईचे आदेश दिले.

काळबादेवी भागातील जवळपास प्रत्येकच घरात सुवर्णकार कारागिरांचा व्यवसाय सुरु आहे. त्यासाठी भट्टया, धुरांच्या चिमण्यांचा वापर केला जातो. धुरांच्या प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य आधीच धोक्यात आलं आहे. तर भट्टयांमुळे आगीचा वाढता धोकाही आहे.

मुंबईत गेल्या महिन्याभरात आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

काळबादेवी हा परिसर कायम गजबजलेला असतो. जुन्या इमारती आणि अरुंद रस्त्यांमुळे एखादी दुर्घटना घडली, तर अग्निशमन दलाचं वाहनही येऊ शकणार नाही. या भागात सध्या दोन हजारांपेक्षा जास्त अवैध चिमण्या आहेत. काहींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तरीही या भागात सुवर्ण व्यवसाय सुरु आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व सुवर्ण कारागिरांच्या व्यवसायांचं मुंबईतच अन्यत्र स्थलांतर करावं, अशी सूचना मुख्यंमत्र्यांनी महापालिकेला दिली.