मुंबई : कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील क्लिनअप फाऊंडेशनने पुढाकार घेऊन आज लसीकरण मोहीम राबवली. बामला फाऊंडेशन आणि क्लिनअप फाऊंडेशनच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त कचरा वेचक कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अभिनेता अर्जुन कपूर, क्लीनअप फाऊंडेशनच्या प्रमुख संजना रूनवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना संजना रुनवाल म्हणाल्या की, आम्ही कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी पुढील 4 दिवसांसाठी लसीकरण मोहीम राबवणार आहोत. यावेळी 100 पेक्षा जास्त कचरा वेचकांचं लसीकरण होईल. अशाच प्रकारचा उपक्रम आम्ही पुढील काळात देखील राबवणार आहोत. जास्तीत जास्त फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याआधी आम्ही या नागरिकांना गम बूट देणे, रेन कोट देणं, त्यांचे आरोग्य विमा काढणे, मेंटल हेल्थ प्रोग्रॅम राबवणं अशी कामे केली आहेत. पुढील काळात देखील आमचे अशाप्रकारचे उपक्रम सुरू राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट काही दिवसांत राज्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे क्लिनअप फाऊंडेशन आणि बामला फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाची जी मोहीम हाती घेतली आहे ती बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. सध्या अजूनही अनेक कचरा वेचक कर्मचारी लसीकरणासाठी पोहचू शकत नाही. मात्र आपण त्यांना लसीकरणापासून वंचित न ठेवता त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं. त्यामुळे दोन्ही फाऊंडेशनचं कौतुक आहे. या लसीकरण मोहिमेतून एकही व्यक्ती वंचित राहता कामा नये.
लसीकरण मोहिमेबाबत बोलताना अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला की, या मोहिमेमध्ये मला सहभागी होता आलं ही नक्कीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली त्यामध्ये कचरा वेचक कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती सुद्धा लसीकरणापासून वंचित राहणं हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे क्लीनअप फाऊंडेशन आणि बामला फाऊंडेशन खूप कौतुक आहे.
क्लीनअप फाऊंडेशनबाबत अधिक माहिती देताना संजना रूनवाल म्हणाल्या की, मी मागील 4 वर्षापूर्वी आमच्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांना मदत कऱण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आम्ही लसीकरण मोहिम राबवण्याबरोबरच त्याच्या जनजागृतीचं देखील काम करत आहोत. त्यामाध्यमातून आम्ही जास्तीत जास्त कचरा वेचक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांचं लसीकरण करणार आहोत. आम्ही अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांसाठी पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील आम्ही वेळोवेळी करत असतो. यासोबतचं त्यांना शिक्षण देणं, त्यांना विमा संरक्षण देणं ही देखील कामं आम्ही करत असतो. आमच्या सोबत असणारे बामला फाऊंडेशन देखील मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण विषयवार काम करत आहे. यांच्यावतीने अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू फौंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणांत देण्यात आल्या होत्या.