नवी मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोच्या धोकादायक घरात राहणाऱ्या नवी मुंबईच्या रहिवाशांना आज दिलासा मिळाला आहे. कारण सिडकोनं त्यांची मागणी पूर्ण केली आहे. त्यांच्या 20 वर्षांच्या लढाईला अखेर यश आलं आहे.
धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोनं परवानगी दिली आहे. याचा 55 हजार रहिवाशांना फायदा होणार आहे.
सिडकोकडून घरं घेतल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळं काही वर्षातच या घरांची अवस्था खराब झाली. पावसाळ्यात तर स्लॅबला गळती लागते. त्यामुळं स्लॅब कधीही कोसळेल या भीतीनं रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. अखेर नव्यानं इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं इथल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
सध्या 9 इमारतींना पुर्नविकासाठी ना हरकत प्रमाणपत्र सिडकोकडून देण्यात आलं आहे. इतर इमारतींचाही मार्ग लवकरच मोकळा होईल.
सर्वसामान्याची आयुष्याची कमाई एक घर घेण्यात जाते. नवी मुंबईतल्या रहिवाशांनीही सिडकोच्या घरांमध्ये जमा पुंजी गुंतवली. मात्र काही वर्षात घरांची अवस्था वाईट झाली. आता इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असला तरी निष्कृष्ट बांधकाम झालं त्याचं काय? हा प्रश्न कायम आहे.