मुंबई: मुंबईच्या एका चिमुरड्यानं थेट युनेस्कोच्या यूथ स्पर्धेत आपला झेंडा रोवला आहे. आहान फडणीस असं या ११ वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे. तो मुंबईतल्या शिवडी भागात राहतो. जगाचा शाश्वत विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी युनेस्कोतर्फे यूथ स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेतल्या ३ गटांपैकी प्रथम गटात आहाननं आपलं नाव कोरलं आहे.

आहाननं फक्त दुसरी पर्यंत शिक्षण घेतलं असून तो आता होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिकतो आहे. १० ते १४ वयोगटात आहाननं कंट्रोल, अल्ट आणि डिलीटच्या माध्यमातून देशभरातल्या विस्थापितांचे प्रश्न सोडवण्याचा प्रकल्प सादर केला.

पारितोषिक मिळाल्यानंतर आहाननं पालकांसोबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

जगभरातील विविध प्रश्नांची उत्तरे युवा वर्गांनी शोधावी या दृष्टीकोनातून युनोस्कोच्या ‘युथ क्लब’तर्फे दरवर्षी ‘युनोस्को युथ स्पर्धा’ आयोजित करण्यात येते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत आहानने भाग घेतला होता.



आहानचा नेमका प्रकल्प काय?

ज्याप्रमाणे कॅम्प्युटरमध्ये कंट्रोल, अल्ट आणि डीलीटच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात, त्याच प्रकारे आहानने विस्थापितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंट्रोल अल्ट आणि डीलीट ही संकल्पना राबवून प्रकल्प केला आहे.

विस्थापितांचे प्रश्न कंट्रोल करण्यासाठी त्यांना तात्पुरते नागरिकत्त्व देणे, विस्थापितांना जगभरात राहण्याची संधी उपलब्ध करून देणे. त्यांच्या प्रश्नांसाठी देशभरातून कशाप्रकारे एकत्र यायाला हवे. यावर त्याने भाष्य केले आहे.

तर अल्टच्या माध्यमातून विस्थापितांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना शिक्षणाचे धडे देण्यावर भर देण्यात यावा. तर देशांनी विस्थापितांसाठी वेगवेगळ्या प्रकारची निधीची तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत त्याने मांडले आहे.

विस्थापितांना सरंक्षण देण्यासाठी युध्द आणि दहशतवाद डिलिट करण्याचा प्रस्ताव आहाने डिलिटच्या माध्यमातून आपल्या प्रकल्पात मांडल.

VIDEO: