नवी मुंबईत 15 हजार घरांची विक्री, सिडकोची लॉटरी
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2018 10:16 PM (IST)
सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या 15 हजार घरांच्या विक्रीसाठी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत स्वतःचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोने खुशखबर आणली आहे. सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या 15 हजार घरांच्या विक्रीसाठी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. विशेष म्हणजे या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. 15 ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याची सिडकोची तयारी आहे. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही घरं कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण 11 गृहप्रकल्पांचा समावेश आहे. सिडकोने याआधी विविध गृहप्रकल्प उभारले आहेत, परंतु एकाच वेळी 14 हजार 820 घरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरं पंतप्रधान आवास योजनेसाठी असतील. स्वातंत्र्य दिनापासून या घरांच्या प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी सव्वा लाख घरांची निर्मिती केली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. आजही सिडकोच्या घरांना सर्वसामान्य घटकांची पसंती आहे, त्यामुळेच आगामी काळात विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पंधरा हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करतानाच पुढील वर्षभरात 40 हजार घरांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या घरांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच ऑनलाईन प्रक्रिया आतापर्यंतच्या विविध गृहप्रकल्पात घरांच्या नोंदणीसाठी सिडकोने अर्जविक्रीची प्रक्रिया राबवली होती. अर्जपुस्तिका विक्री करताना येणाऱ्या अडचणी, त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांची होणार दमछाक तसेच या प्रक्रियेसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ या गोष्टींचा विचार करुन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अर्जपुस्तिका विक्रीला छेद देत म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाइन अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 14 हजार 820 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. दोन वर्षांत घराचा ताबा शहराच्या पाच नोडमध्ये 11 कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून 14 हजार 820 घरांचं काम सुरु करण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या ग्राहकांना सहा हप्त्यात घरांचे पैसे भरता येणार आहेत.