नवी मुंबई : नवी मुंबईत गृहखरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या अकराशे जणांचं स्वप्न व्हॅलेंटाईन्स डे च्या मुहूर्तावर प्रत्यक्षात उतरणार आहे. सिडकोच्या महागृहनिर्मितीत गेल्या वर्षी शिल्लक राहिलेल्या 1100 घरांची सोडत आज (गुरुवार) निघणार आहे.


बेलापूरमधील सिडकोच्या मुख्यालयात सकाळी 11 वाजता सोडतीला सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांसाठी खुल्या असलेल्या या घरांसाठी एकूण 58 हजार 786 अर्ज आले आहेत. या सोडतीचं थेट प्रक्षेपण सिडकोच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवर उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी 14 हजार 838 घरांची सोडत गांधी जयंती निमित्ताने दोन ऑक्टोबरला काढण्यात आली होती. त्यातील प्रकल्पग्रस्त, पत्रकार, माथाडी, मापाडी, सिडको कर्मचारी यांच्यासाठी राखीव असलेल्या घरांतून एक हजार 100 घरं शिल्लक राहिली होती.

या घरांना राखीव संवर्गातून मागणी न आल्यामुळे ती आता सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
या घरांवर असलेले आरक्षण उठवण्यात आल्याने सर्व ग्राहक खुल्या वर्गातील आहेत.