ठाणे : सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ 24 तासांच्या आता सापडलं आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाळाचा शोध लावून, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केले आहे. भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं हे बाळ आहे.

ठाणे पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

“24 तासांच्या आत बाळाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून, बाळ त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. बाळाच्या शोधासाठी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले.”, असी माहिती मधुकर पांडेंनी दिली. शिवाय, ज्या बाळासाठी तक्रार आली होती, त्या व्यतिरिक्त आणखी चार मुलं सापडल्याची माहितीही पांडे यांनी दिली.

पोलिसांनी गुडीया सोनू राजभर, सोनू परशुराम राजभर, विजय श्रीवास्तव या तिघांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती कक्षातून पाच तासांच्या बाळाचं अपहरण झालं. एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती.

पोलिसांच्या पाच ते सहा पथकांनी बाळाचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्यांना अखेर यश आले.

बाळ सापडले असले, तरी या प्रकारानंतर सिव्हिलमधील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरम्यान, याआधी याच जिल्हा रुग्णालयात अनेक चोरी आणि हाणामारीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तरीही सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या नावाने बोंबाबोंब आहे.