मुंबईतील मोठ्या क्षेत्रफळाच्या गृहनिर्माण संस्थांना ओल्या कच-यावर प्रक्रिया करणं आणि बायोगॅस प्रकल्प राबवण बंधनकारक करण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे. मात्र, याची सुरुवात महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्वत:च्या घरापासून केली आहे. महापालिका आयुक्तांच्या पेडर रोडच्या निवासस्थानावरील ओला कचरा तसेच उद्यानातील पालापाचोळ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जात आहे. आणि याच इंधनाचा वापर करुन आयुक्तांच्या घरातला स्वयंपाक शिजवला जात आहे.
विशेष, म्हणजे या बायोगॅस प्रकल्पामधून तयार होणा-या इंधनाच्या मदतीनं आयुक्तांच्या घरातला स्वयंपाक केला जात आहे. तब्बल 25 किलो क्षमतेचा हा बायोगॅस प्रकल्प उभारून आयुक्तांनी स्वत:पासून याची सुरुवात करत जनतेला अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक सोडून इतर कचर्यापासूवर बायो मिथेनायझेशन तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून गॅस निर्मिती करण्यात येतो. हा गॅस सर्व रहिवाशांना मोफत पुरवला जातो.
त्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना तो बंधनकारक करण्यात यावा,अशी मागणी तत्कालीन काँग्रेस नगरसेविका अजंता यादव यांनी केल्यानंतर याबाबतचे पत्र महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्यावतीने नगरविकास खात्याला पाठवले होते. मुंबईतील 2 हजार चौरस मीटर क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना अशा प्रकारचा प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर स्वत:च्या निवासस्थानात निर्माण होणार्या कचर्यापासून बायोगॅस प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेतला.