मुंबई : संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. राजीनामा घेणं, गुन्हा दाखल करुन मोकळे होणं म्हणजे न्याय देणं नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले.


ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.


राज्यातील विरोधी पक्ष दुतोंडी : मुख्यमंत्री
कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक झालं आहे. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.