मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना फेसबुकवर वेगवेगळे अनुभव आले. यात एक नवीन प्रकार समोर येत आहे. एखाद्या व्यक्तीचे बनावट खाते बनवून मित्रांच्या मेसेंजरमध्ये जाऊन पैसे मागण्याचे प्रकार समोर येत आहेत. घरी समस्या आहे, कुणी आजारी आहे असे सांगून पैसे मागितले जातात. नंतर चौकशी केल्यावर कळतं की असे मेसेज अनेकांना गेले असतात. यात काही गडबड आहे हे पडताळून पाहिल्यावर कळतं की पैसे मागणारी व्यक्ती ही ती व्यक्तीच नसते.
हा अनुभव काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील आल्याची मंत्रालयात चर्चा होती. नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देखील असाच अनुभव आला.
त्यांच्या नावे खोटे फेसबुक खाते सुरू करण्यात आले आणि त्या खात्यातून गुगल पे पर पैसे द्यावे असे मेसेज अष्टपुत्रे यांच्या ओळखीच्या मित्रांना गेले. अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना या मेसेज बाबत कळल्यानंतर त्यांनी तात्काळ पैसे मागणारे मेसेज आणि खाते बोगस आहे,त्यावर विश्वास ठेवू नये म्हणून विनंती केली आहे.
एकूणच कोरोनाकाळात अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे खाते सुरु करून त्याच्या मित्र मंडळींना मेसेज करून पैसे लुटण्याचे प्रकार समोर आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्याही खात्यांवर विश्वास ठेवताना सगळ्यानी काळजी घेणं गरजेचं आहे. फ्रेंड रिक्वेस्ट कोणी पाठवली तरी Mutual Friend म्हणून तपासून न बघता लोक मित्र यादीत येतात आणि त्या माध्यमातून असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सतर्क राहण्याची गरज आहे.