नेवाळीच्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
एबीपी माझा वेब टीम | 02 Dec 2018 10:47 PM (IST)
ज्याप्रमाणे मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले गुन्हे मागे घेण्यात आले, तसेच नेवाळी आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्याची मागणी आगरी समाजाच्या वतीने करण्यात आली.
कल्याण : दोन वर्षांपूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आगरी कोळी महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ज्याप्रमाणे मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले गुन्हे मागे घेण्यात आले, तसेच नेवाळी आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्याची मागणी आगरी समाजाच्या वतीने करण्यात आली. याला उत्तर देताना याबाबतीत सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल आणि निष्पाप लोकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या कार्यक्रमापूर्वी सीएम चषक स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आंबिवलीत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी एनआरसी कंपनीच्या कामगारांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. त्यावर त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.