मुंबई : उत्तर भारतीय नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे प्रांतवाद निर्माण झाला असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावर बोलताना केली आहे. उत्तर भारतीय महापंचायतच्या वतीने मुंबईत कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे त्यांनी हे संपूर्ण भाषण हिंदीतून केले.

यावेळी बोलताना त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर थेट टीका करत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हक्कावरून आपल्या शैलीत फटकारे ओढले. राज ठाकरे यावेळी म्हणाले की, स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणल्यास संघर्ष होणारच आहे. उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरीही लोकं बाहेर  कामाला का जातात? असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे यावेळी म्हणाले की, आपण जिथे जातो तिथली संस्कृती भाषा शिकणे गरजेचे, कुठल्याही देशात गेल्यावर शिकता, मग महाराष्ट्रात मराठी का नको? महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येत आहेत. यूपी-बिहारमध्ये अशा उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला.


तुम्ही तुमच्या नेत्यांना रोजगार आणि सुविधा देण्यासाठी का विचारात नाहीत,असे म्हणत त्यांनी फक्त महाराष्ट्रातूनच उत्तर भारतीयांना हटविले जात नाही, असे सांगितले. आसाम, गुजरातमधून यूपी-बिहारींना हटविले तर प्रश्न का उपस्थित नाही राहिले? आम्ही आंदोलन केल्यावर मात्र प्रश्न उपस्थित केले जातात, असे ते म्हणाले.


महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांच्या जाहिराती यूपी-बिहारच्या वर्तमानपत्रात येतात, मात्र मराठी वर्तमानपत्रात येत नाहीत. मग तिकडच्या लोकांना इथे रोजगार मिळतो आणि इकडचे तरुण बेरोजगार राहतात. उत्तर भारतीय इथे येऊन उलट उर्मट भाषा वापरतात असेही ते म्हणाले. मराठी लोकांनी युपी-बिहारमध्ये जाऊन उर्मट भाषा वापरली तर तुम्ही आरत्या कराल का? असा सवाल त्यांनी केला.मराठी माणूस काम करत नाहीत अशी टीका केली जाते. माझ्यासोबत चला मराठी माणूस काम करतो का नाही ते दाखवतो. मराठी माणूस लीगल ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतात, असेही ते म्हणाले.

मग आम्ही गप्प बसायचे का?   

यूपी-बिहारवरून रोज ट्रेन भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. मुंबईत झोपडपट्ट्या वाढत आहेत, रस्ते कमी पडत आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढायला देखील अनेक उत्तर भारतीय जबाबदार आहेत. महाराष्ट्र पोलिसांना विचारा त्यांचा तपासातला जास्त वेळ कुठे जातो? असेही ते म्हणाले. आमच्या आयाबहिणींची इज्जत आम्ही वेशीवर टांगली नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का? बाहेरचे लोकं इथे येऊन दंगे करतात हे आम्ही सहन करायचे का? युपी-बिहारमध्ये जाऊन आम्ही असे केल्यावर तुम्ही सहन कराल का? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो  

राज ठाकरे पुढे म्हणाले की, इथं इतकी गर्दी झालीय की आता तुम्ही सांगायला हवं की येऊ नका. आमच्या युवकांना रोजगारच मिळत नाही. बाहेरचे लोक येत राहिले तर राज्यातील युवकांना रोजगार कसा मिळणार, असे ते म्हणाले. अन्य राज्यांतून गुन्हेगार येत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. दक्षिण भारतात रोजगार उपलब्ध झाल्याने तिकडचे लोंढे थांबले, तसे रोजगार उत्तर भारतातही निर्माण करावेत असे ते म्हणाले. प्रत्येक राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो, असे ठाकरे म्हणाले.

अमिताभ बच्चन यांचं यूपीवर प्रेम, तर माझं महाराष्ट्रावर प्रेम असण्यात गैर काय?  

आम्ही आंदोलने केली त्यात चूक काय होतं? तुमच्याकडे अशी स्थिती असती तर तुम्ही अशीच भूमिका घेतली असती. अमिताभ बच्चन मुंबईत राहतात आणि निवडणूक लढायला यूपीत जातात. त्यांना जर युपीवर प्रेम असेल तर माझं महाराष्ट्रावर प्रेम असण्यात गैर काय? असा सवाल करत महाराष्ट्राचे उत्कर्ष करणे माझे काम, तुम्ही तिथल्या नेत्यांना तिथला उत्कर्ष करायला सांगा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 




    • उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरीही बाहेर लोकं कामाला का जातात?


    • संस्कृती भाषा शिकणे गरजेचे, कुठल्याही देशात गेल्यावर  शिकता, मग महाराष्ट्रात मराठी का नको?



    • आसाम, गुजरातमधून युपी-बिहारींना हटविले तर प्रश्न का उपस्थित नाही राहिले?



    • महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांच्या जाहिराती युपी-बिहारच्या दैनिकांत येतात



    • मराठी लोकांनी युपी-बिहारमध्ये जाऊन उर्मट भाषा वापरली तर तुम्ही आरत्या कराल का?



    • तुम्ही तुमच्या नेत्यांना रोजगार आणि सुविधा देण्यासाठी का विचारात नाहीत



    • मराठी माणूस काम करत नाहीत अशी टीका केली जाते



    • माझ्यासोबत चला मराठी माणूस काम करतो का नाही ते दाखवतो



    • मराठी माणूस लीगल ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतात



    • महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येताहेत



    • यूपी-बिहारमध्ये अशा उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का?



    • यूपी-बिहारवरून रोज ट्रेन भरून येतात आणि रिकाम्या जातात



    • मुंबईत झोपडपट्ट्या वाढत आहेत, रस्ते कमी पडत आहेत



    • महाराष्ट्र पोलिसांना विचारा त्यांचा तपासातला जास्त वेळ कुठे जातो



    • आमच्या आयाबहिणींची इज्जत आम्ही वेशीवर टांगली नाही



    • बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का



    • बाहेरचे लोकं इथे येऊन दंगे  करतात हे आम्ही सहन करायचे का



    • यूपी-बिहारमध्ये जाऊन आम्ही असे केल्यावर तुम्ही सहन कराल का



    • इथं इतकी गर्दी झालीय की आता तुम्ही सांगायला हवं की येऊ नका



    • आमच्या युवकांना रोजगारच मिळत नाही, मग संघर्ष कसा थांबवणार



    • बाहेरचे लोक येत राहिले तर राज्यातील युवकांना रोजगार कसा मिळणार



    • अन्य राज्यांतून गुन्हेगार येत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही

    • दक्षिण भारतात रोजगार उपलब्ध झाल्याने तिकडचे लोंढे थांबले


    • प्रत्येक राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो