मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या टीकाकारांमध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. ओबीसी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीस यांच्यात वाद निर्माण करुन समाजात विष कालवत असल्याचा आरोप केला आहे. छगन भुजबळ हे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असताना राहुल घुले हे तेथील वैद्यकीय अधिकारी होते. त्यावेळी मी तुरुंगात छगन भुजबळ यांचा जीव वाचवला होता. मात्र, त्यावेळी माझी बदली करण्यात आली होती. मी काही भुजबळ द्वेषी नाही. छगन भुजबळ यांनी थोडातरी समंजसपणा दाखवायला हवा, असे राहुल घुले यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


सध्या मराठा-ओबीसी समाजातील समतोल बिघडत आहे. त्यामुळे हा सर्व मुद्दा पुढे आला आहे. ओबीसींसाठी सुद्धा लढा दिला पाहिजे, मात्र संविधानिक पद्धतीनं दिला पाहिजे. कोणी माथी फिरवण्याचे काम करु नये, असा टोला राहुल घुले यांनी भुजबळांना लगावला. मराठा आणि ओबीसी राजकारणाचा ज्वलंत विषय सध्या सुरु आहे. ही बाब चिंतादायक आहे. काही लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. हे लोक दुर्दैवाने ओबीसी समाजाचे आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा दिला. तो लढा यशस्वीही झाला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. मात्र, काही ओबीसी नेते याचे भांडवल करु पाहत आहेत. छगन भुजबळ यांनी अलीकडेच मराठा समाजातील लोकांची दाढी करु नका, त्यांना आपापसात भादरु द्या, असे आवाहन नाभिक समाजाला केले होते. भुजबळ यांचे हे वक्तव्य सामाजिक विद्वेष पसरवणारे आहे. राज्यात सध्या असणारी परिस्थिती कोणालाही नको आहे. मात्र, भुजबळ यांच्यासारखे लोक तेल ओतून ही परिस्थिती आणखी पेटवण्याचे काम करत आहेत. भुजबळ पुरोगामी महाराष्ट्रात विषमता का पसरवत आहेत?, असा सवाल राहुल घुले यांनी उपस्थित केला.


महाराष्ट्राचा युपी बिहार करण्याचे काम सुरु आहे: राहुल घुले


समता परिषद ही छगन भुजबळ यांची संस्था आहे. तिकडे त्यांनी स्वत:ला हवे तसे वागावे. मराठा-ओबीस समाजात भांडणे लागू नये, अशी सर्वांची इच्छा आहे. सामाजिक सलोखा परिषदेसाठी आम्ही मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करणार आहोत. गोरगरीब मराठ्यांचे देखील भलं व्हावं असं सर्वांना वाटते. आधी धर्मावरुन भांडणं व्हायचीत आणि आता जातीजातीत विष पसरवलं जात आहे. महाराष्ट्राचे युपी बिहार बनवण्याचे काम होत आहे. आम्ही सर्व सुशिक्षित लोकं आहोत त्यामुळे आम्ही पुढे आलेलो आहोत. ही लढाई सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आहे. ओबीसींनी पुढे येत सामाजिक सलोखा राखावं असं जरांगे बोलले. त्यामुळे आम्ही आज त्यांच्याशी बोललो आहे, असे राहुल घुले यांनी सांगितले.


आरक्षण हा विषय सोपा नाही. मात्र, ओबीसींविरोधात विष पसरवण्याचे काम होत आहे, सामाजिक स्वास्थ्य बिघडलं तर अवघड होईल. आमचं अधिवेशन देखील होईल शिर्डीत होईल, पुढील १५ दिवसात यासंदर्भात आम्ही सांगू. गरीब ओबीसींना भरडवू नका ऐवढंच आमचं म्हणणे असल्याचे राहुल घुले यांनी सांगितले.


आणखी वाचा


सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यावर फोकस करावं : छगन भुजबळ