मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरींग कायद्याखाली छगन भुजबळ सध्या अटकेत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी आहे.

बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली.

याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे.

समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुरु आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.