मुंबई : बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात नव्या अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीनुसार गणित विषय शिकवताना शिक्षकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये बदललेल्या अभ्यासक्रमात शिक्षकांनी शिकवताना आता जोडाक्षर न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.


उदाहरणार्थ


आता 32 हे तीस दोन असे शिकवावे लागणार आहे. तर 45 हे चाळीस आणि पाच असं शिकवावं लागणार आहे.


जोडाक्षर शिकवताना अनेक शब्द हे मुलांना गणिताबाबत भीती आणि नावड निर्माण करतात असं दिसून आलं आहे. त्यामुळे बालभारतीच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकण्यात येत आहेत. या पद्धतीमध्ये बोलणे आणि लिहणे हा क्रम सारखा राहतो. शिवाय विद्यार्थ्यांना संख्यावाचन सहज जमते. 21 ते 99 या संख्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे.


इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगू, तामिळ, मल्याळी या भाषेत सुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते. त्यामुळे याचा अवलंब या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आला आहे. मात्र या बदलामुळे शिक्षकांना शिकवताना मोठे बदल करुन या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्याचं मोठं आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे.