मुंबई : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरातही हे उपस्थित होते. या वेळी चर्चेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.


सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे. यावर तुमच्याकडे एवढ्या खात्यांची जबाबदारी का? असा प्रश्न बाळासाहेब थोरातांनी विचारला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी उत्तर देताना म्हटलं की, बाळासाहेब थोरातांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत येण्यास तयार असतील, तर माझी काही खाती कमी करण्यास मी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.


अशा रीतीने चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब थोरातांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर देऊन टाकली. मात्र तितक्याच नम्रतेने बाळासाहेब थोरात यांनीही चंद्रकांत पाटलांनी ऑफर नाकारली.


याशिवाय खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक डेडलाईन दिली आहे. राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही. तसेच खड्डा दाखवणाऱ्यास बक्षिसासाठी घोषणाही त्यांनी यावेळी केली. गेल्या चार वर्षात 15 डिसेंबरनंतर माझ्याकडून कोणीही बक्षिस जिंकू शकलेलं नाही, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझा व्हिजन' या कार्यक्रमात केला.