अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2018 01:16 PM (IST)
कॉ. माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर तब्बल 30 तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही.
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकरवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनावर सरकारने दाखवलेल्या उदासिनतेबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. "कॉ. माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर तब्बल 30 तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही. शिवाय 30 तासांनंतर सरकारने संपर्क करुन आणखी दोन तास थांबा, असं उत्तर कुटुंबीयांना दिलं. त्यावर सरकारने दिलगिरी व्यक्त करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं," अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण घटनेबाबत खेद व्यक्त केला. "कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अत्यंसंस्कराबाबत नेमकं काय झालं, याची माहिती घेत आहोत. या सर्व घटनेची दिलगिरी व्यक्त करुन, नेमकं काय झालं हे संध्याकाळपर्यंत कळेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. नाशिकच्या मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं 12 नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. स्वातंत्र्य सैनिक, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, झुंजार आणि लढवय्ये व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. डाव्या चळवळीतील एक झुंजार नेते म्हणून गेली ५ ते ६ दशकं कॉम्रेड माधवराव गायकवाड कार्यरत होते.