कल्याण : कल्याणमध्ये सध्या चादर गँगची दहशत पसरल्याचं पाहायला मिळत आहे. ही गँग दुकानाच्या शटरसमोर चादर धरुन अवघ्या काही मिनिटात हात साफ करुन जाते. या चोरट्यांनी कल्याणच्या दोन मोबाईलच्या दुकानात अशाच पद्धतीनं केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चार जण एका दुकानाबाहेर येतात, त्यातला एक जण चादर झटकण्याचं नाटक करतो, तर तिघे शटर उचकटतात, याचवेळी त्यांच्यातला एक जण आत जातो आणि आरामशीर दुकान साफ करुन पुन्हा तशाच पद्धतीने बाहेर येतो.

अशाप्रकारे केलेल्या चोरीत एका दुकानातून 18 लाखांचे आयफोन आणि दोन लॅपटॉप, तर दुसऱ्या दुकानातून पाच लाखांचे मोबाईल चोरी करण्यात आले आहेत.

याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ आणि एमएफसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गँगचा शोध घेणं हे सध्या पोलिसांसमोर आव्हान बनलं असून व्यापाऱ्यांमध्ये यामुळे धास्ती पसरली आहे.