मुंबई : संजय गांधी नॅशनल पार्कची 165 हेक्टर जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याला केंद्रानं हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
केंद्राच्या या होकारानंतर मेट्रो-3 चं कारशेड आरे कॉलनीत उभारण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत. कुलाबा ते अंधेरी (सीप्झ) मार्गावर धावणाऱ्या मेट्रो 3 च्या कारशेडसाठी ही धडपड सुरु आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण आरे कॉलनी इको सेन्सिटीव्ह झोन म्हणून घोषित करण्याची मागणी आधी राज्य सरकारनं केली होती. मात्र आपल्या निर्णयापासून माघार घेत मुख्यमंत्र्यांनी आरेच्या कारशेडसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 35 बिबटे असल्याची माहिती देण्यात आली होती. आरे परिसरात त्यापैकी सात बिबटे आढळल्याची माहिती आहे.