मुंबई : लोकल मुंबईची लाईफलाईन समजली जाते. मात्र मुंबईकरांच्या नव्या वर्षाची सुरुवातच लोकलच्या मेगाब्लॉकने झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. मात्र मेगाब्लॉकने प्रवाशांची गैरसोय झाली असून मध्ये रेल्वे आणि हार्बर मार्गावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्ये रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र हार्बर मार्गावर आज सकाळीच जुईनगर आणि वाशीदरम्यान तांत्रिक कारणामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
2016 मध्ये रेल्वेच्या बिघाडाने मुंबईकरांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील गर्दीमुळे अडचणीचा सामना करावा लागला.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर मध्यरात्रीपासूनच घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.