मुंबई : पावसाळ्यामध्ये दरवर्षी मुंबईतील लोकलचं रडगाणं सुरु होतं. मात्र यंदा मध्य रेल्वे मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मध्य रेल्वेला मुंबई हवामान विभागाकडून नाऊकास्ट अपडेट्स मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लोकलचं वेळापत्रक तयार करायला मदत होणार आहे. पाऊस जास्त असल्यास त्यानुसार नियोजन करणं प्रशासनाला शक्य होणार आहे.

मध्य रेल्वेवर जिथे जास्त पाणी भरतं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी 32 हॉर्स पॉवरचे 42 पंप लावले जाणार आहेत. त्यापैकी 16 पंप बीएमसी लावणार असून त्यामध्ये दोन पंप एक हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे असतील. त्यामुळे पाणी भरल्यास ते लवकर दुसरीकडे उपसलं जाईल, अशी माहिती प्रभारी डीआरएम संजयकुमार पंकज यांनी 'एबीपी माझा'ला दिली.

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांची सफाई न झाल्यामुळे मध्य रेल्वे प्रामुख्याने रखडते. मात्र यावर्षी सफाई झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. आता येणाऱ्या काळातच हा दावा किती खरा आहे, ते स्पष्ट होईल.