मुंबई : मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडामुळे गाड्या रद्द होतात हे आपण ऐकलं असेल. मात्र आता गाड्या रद्द होण्याचं नवीन कारण समोर आलं आहे. मोटरमनची कमतरता असल्याने दररोज लोकलच्या अनेक फेर्या रद्द केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
मध्य रेल्वेवर गेल्या पाच दिवसात ऐन गर्दीच्या काळात जवळपास 40 लोकल रद्द करण्यात आल्या. यामागे तांत्रिक बिघाडाचं कारण देण्यात आलं. मात्र खरं कारण वेगळंच होतं.
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोटरमनच्या पदासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 20 टक्के जागा रिक्त आहेत. लोकलमध्ये 898 मोटरमनची गरज असताना सध्या फक्त 690 मोटरमन कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागत आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेकडून मात्र मोटरमनची कमतरता नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
मोटरमनच्या कमतरतेमुळे 27 मे रोजी मेन लाईनवरील 10, तर हार्बर लाईनवरील 14 लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या. याच कारणांमुळे 25 मे रोजीही 10 फेर्या, 26 मे रोजी दोन फेर्या, 28 मे रोजी पाच फेर्या आणि 29 मे रोजी तीन फेर्या रद्द करण्यात आल्या.
गर्दीच्या वेळेला एखादी लोकल रद्द झाली, तर तिचा ताण पुढच्या लोकलवर पडतो. त्यामुळे एकाच लोकलमध्ये दोन लोकलचे प्रवासी प्रवास करतात. परिणामी गर्दीत लोकलमधून पडून अपघाताची शक्यता वाढते.
उन्हाळ्यात अनेक मोटरमन सुट्टीवर जात असतात. जे मोटरमन काम करत असतात ते ओव्हरटाईम करण्यास नकार देतात. त्यामुळेच मोटरमनच्या कमतरतेमुळेच अनेकदा लोकल फेर्या रद्द केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे. येत्या काळात मोटरमनची रिक्त पदे न भरल्यास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याच जीवघेण्या गर्दीत प्रवास करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेवर मोटरमन नसल्याने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द!
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jun 2018 07:58 PM (IST)
गाड्या रद्द होण्याचं नवीन कारण समोर आलं आहे. मोटरमनची कमतरता असल्याने दररोज लोकलच्या अनेक फेर्या रद्द केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -