Parel Terminus : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे (CSMT) स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईतील परळ (Parel) येथे मध्य रेल्वेचं नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे (Central Railway ) प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईला चौथं मध्य रेल्वेचं टर्मिनस मिळणार आहे.  सध्या परळमध्ये या जागेमध्ये रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे. आता येथील काही युनिट हे माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरुन दररोज 88 लांब पल्ल्याच्या गाड्या ये - जा करत असतात. त्यामुळे इथल्या यंत्रेणवर प्रचंड ताण येतो. तसेच दादर ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकादरम्यान काही तांत्रिक झाला तर त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. अनेक रेल्वे यामुळे रद्द कराव्या लागतात. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी परळ येथे नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 


नक्की काय आहे योजना?


छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर उपनगरीय रेल्वे सोबत लांब पल्ल्यांच्या गाड्यावर देखील मोठ्या प्रमाणावर ताण आहे. तो कमी करण्यासाठी आता परळ वर्कशॉपच्या जागेवर परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस हे टर्मिनस उभारण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत मध्य रेल्वेचे फक्त तीन टर्मिनस आहेत. जिथून लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये - जा होत असते. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानकांच्या यंत्रणांवर प्रचंड ताण येत असल्याचं चित्र आहे. त्यातच एकट्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 88 लांब पल्ल्याच्या गांड्यांची ये-जा सुरु असते. तर जवळपास 1200 पेक्षा अधिक उपनगरीय रेल्वे म्हणजेच मुंबई लोकल या प्रवास करत असतात. 


 सध्या इथल्या रेल्वे प्रशासनावर जो ताण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वर्षभरात या टर्मिनसचं काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. परळ टर्मिनससाठी परळ वर्कशॉपची 19 एकरच्या जागेची निवड करण्यात आली आहे. परळ टर्मिनसवर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पाच प्लॅटफार्म बनवण्याची योजना करण्यात आली आहे. यामध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी पाच स्टेबलिंग मार्गिका, तर गाड्यांची व्यवस्थित पाहणी करण्यासाठी तसेच त्यांच्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाच पिट लाईनही उभारण्यात येणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांची तरतुद रेल्वेकडून करण्यात आली आहे.  त्यामुळे आता रेल्वेकडून मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक टर्मिनस लवकरच येणार आहे. 


हे ही वाचा : 


Mumbai Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ आणखी छोटी दरड कोसळली; उर्से तळेगावपासून वाहतूक बंद