कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासूनचा पगार मिळालेला नाही. पगार न मिळाल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसात पगार दिला नाही, तर परिवारासह आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्वतःची परिवहन सेवा असून त्यात जवळपास 575 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांचा पगार थकला आहे. एकीकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत असला, तरी परिवहन कर्मचाऱ्यांना पगार द्यायला मात्र प्रशासन टाळाटाळ करत आहे. शिवाय पीएफ, ऍरियर्स, आगरातल्या असुविधा असे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
प्रामाणिकपणे काम करूनही दोन दोन महिने पगार मिळत नसल्याने केडीएमटी कर्मचारी अस्वस्थ झाले असून आता घर कसं चालवायचं? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अखेर येत्या दोन दिवसात जर महापालिकेनं आम्हाला पगार दिला नाही, तर 4 ऑगस्टपासून परिवारासह रस्त्यावर उतरू आणि चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा केडीएमटी कर्मचाऱ्यांनी दिलाय.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासन उदासिन असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.