मुंबई: मुंबईतल्या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन सुरु झालेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अभियंत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या दोन्ही नगरसेवकांवर करण्यात आला आहे. तसेच त्यांचा रस्ता अडवल्याचाही आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या नगरसेवक आणि नेत्यांना मुंबईतील खड्ड्यांप्रकरणी अभियंत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज पालिकेच्या 4200 अभियंत्यांनी पालिका आयुक्त अजय मेहतांकडे राजीनामे दिले होते. मात्र आयुक्तांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कामावर परतणार नसल्याची भूमिका अभियंत्यांनी घेतली आहे.
निवडणुकांच्या तोंडावर मनसेनं बुधवारी पालिकेच्या मुख्य अभियंत्याला भर रस्त्यात उभं करुन खड्ड्यांना मुख्य अभियंता जबाबदार असल्याची पाटी हातात दिली आणि आंदोलन केलं होतं. त्यानंतर अभियंत्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संबंधित बातम्या:
मी खड्ड्यांसाठी जबाबदार, मनसेकडून मुख्य अभियंत्यांच्या हाती फलक
'संदीप देशपांडेंवर कारवाई करा', पालिकेच्या 4200 अभियंत्यांचे राजीनामे