मुंबई : गेली चार दशकाहून अधिक काळ मुंबईतील अनेक दैनिके, पाक्षिके, मासिके तसेच दिवाळी अंकांमध्ये आपल्या खुसखुशीत व्यंगचित्रांचा फुलोरा सजवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार बळी लवंगारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

आपल्या व्यंगचित्रांनी वाचकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणारे बळी लवंगारे यांची गेली चार दशके नवाकाळ, पुण्यनगरी, दोपहर का सामना यासारख्या दैनिकात व्यंगचित्रे प्रसिद्ध होत होती. मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या लवंगारे यांना लहानपणापासून चित्रकलेची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या कलेला हास्याची किनार देत व्यंगचित्रांच्या साहाय्याने त्यांना आधी पाक्षिके आणि मासिकात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

गिरणगावातल्या काळाचौकीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या या कलाकाराला नावलौकिकही याच भागाने मिळवून दिला. त्यांनी प्रारंभी हास्य व्यंगचित्रे आणि त्यानंतर सामाजिक - राजकीय स्थितीवर भाष्य करणारी हजारो व्यंगचित्रे रेखाटली. त्यांची व्यंगचित्रं अधिक प्रभावी तसेच मर्मभेदी ठरू लागल्यामुळे ते वर्तमानपत्रांच्या मुख्य प्रवाहातही आले.

दोपहर का सामनामध्ये सलग 15 वर्षे त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. तसेच अनेक व्यंगचित्र मासिकांमध्येही त्यांच्या व्यंगचित्रांनी मानाचे स्थान मिळवले. काही काळ मार्मिक या प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिकांत त्यांची अफलातून व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.

नेहमी हसतमुख असलेल्या साडे चार फुट उंचीच्या लवंगारे यांना पाहून सारेच म्हणायचे, मूर्ती लहान पण किर्ती महान. मात्र आता त्यांच्या निधनाने व्यंगचित्रविश्वाने एक अष्टपैलू आणि वेगवान मास्टरस्ट्रोकचा धनी चित्रकार गमावला आहे.