मुंबई: शीना बोरा खूनप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. इंद्राणी आणि पीटर मुखर्जीचं कॉल रेकॉर्डिंग आता समोर आलं आहे. हे रेकॉर्डिंग पीटरचा मुलगा राहुलनं केलं होतं.

 

एका न्यूज चॅनलनं हे ऑडिओ टेप जारी करुन असा दावा केला आहे की, शीनाच्या खुनाची माहिती लपवण्यासाठी इंद्राणी आणि पीटर राहुलची दिशाभूल करीत होते.

 

पीटर आणि राहुलमध्ये झालेल्या एका संभाषणामुळे संशयाची सुई पीटरकडे वळते आहे. शीना बेपत्ता झाली तर मग तू इतका का त्रास करुन घेतो आहेस? असा सवाल पीटरनं राहुलला विचारला होता. शीना इंद्राणीची मुलगी असल्याचं पीटरला कळाल्यानंतर सर्वच नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसंच राहुल आणि शीनामध्ये असलेले प्रेमसंबंधही पीटर-इंद्राणीला मान्य नसल्यानंच तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

 

राहुल वारंवार इंद्राणी आणि पीटरकडे शीनाची विचारणा करीत होता:

 

1. एका ऑडिओ टेपमध्ये राहुल आपले वडील पीटरना वारंवार शीनाबद्दल विचारत होता. पीटरने तिची काहीच माहीती नसल्याचं सांगितलं होतं. राहुल म्हणाला की, शीना शेवटची इंद्राणीला भेटली होती. त्यावर पीटर त्याला म्हणाला होता की, तिला जे करायचं ते करु दे. त्यानंतर त्यानं राहुलला  तू गोव्याला ये. याविषयी तिथं बोलू.

 

2. दुसऱ्या टेपमध्ये राहुल पीटरकडे शीनच्या बेपत्ता असण्याबाबत चिंता व्यक्त करत होता. राहुल म्हणाला होता की, शीना कधीही ऑफिसला सहसा रजा घेत नाही. त्यावेळीही पीटरनं त्याला काहीही उत्तर दिलं नाही.

 

3. राहुल आणि इंद्राणी यांच्यात झालेल्या एका संभाषणाचीही एक ऑडिओ टेप समोर आली आहे. यामध्ये इंद्राणी राहुलला म्हणत होती की, तिने शीनाच्या कंपनीतील एचआरशी बोलणं केलं आहे. एचआरच्या मते, ती सुट्टीवर आहे. तसंच इंद्राणी राहुलला म्हणत होती की, शीनाची माहिती मिळताच आपण तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देऊ.

 

- दरम्यान, सीबीआयनं यापैकी सात टेप पुरावा म्हणून वापरले आहेत.

 

- 24 एप्रिल 2012 पासून बेपत्ता होती. 25 ऑगस्ट 2015ला मुंबई पोलिसांनी तिची आई इंद्राणीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती.

 

- इंद्राणीनंतर पहिला पती संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम राय आणि पीटर मुखर्जी यांना अटक केली होती. तर श्याम राय हा माफीचा साक्षीदार झाला आहे.

 

2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले.

 

संबंधित बातम्या: