मुंबई : दुष्काळसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. चारा छावणी, मागेल त्याला टँकर, रोजगार, रोख रक्कमेची मदत या चार गोष्टींचा पालकमंत्र्यांनी दौऱ्यात आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याच्या योजना, काही दुरुस्त्या पूर्ण करून घेतल्या जात आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


तीन हजारच्या वर छावण्या देता येत नाही, मात्र म्हसवडला विशेष बाब म्हणून आम्ही परवानगी दिली. आम्ही मंत्रालयात दुष्काळासाठी वॉर रूम सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी सूचना कराव्यात, दुष्काळाचं राजकारण करु नये, असं आवाहनही चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना केलं.


पीक कर्जला विलंब होण्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवीन कर्ज देणे हे बँकांनी बंद केलेलं नाही. बँक कर्मचारी हे निवडणुकीच्या कामाला नव्हते. तसेच पीक कर्ज मिळाले नाही अशी एकही तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही.


दुष्काळ दौऱ्याला अधिकारी सोबत नव्हते, कारण आचारसंहितेचा बडगा आणि धाक खूप आहे असा काही लोकांनी त्याचा अर्थ काढला गेला. मात्र आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. याचा अर्थ ते ऐकत नाहीत असं होतं नाही, असं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.


दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. काल मुंबईत झालेल्या एका बैठकीत दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आदेश दिले आहेत.