कल्याण : ‘तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा हातात चाबूक घ्यावा लागे’, अशा शब्दात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.


कल्याण-डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून  काल रात्रीपासून डोंबिवलीत खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. मध्यरात्री अचानक खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर आणि स्थायी सभापती रमेश म्हात्रे यांच्यासह बड्या नेत्यांनी भेट देऊन कामाची पाहाणी केली.

यावेळी काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचं आढळलं. यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी नेतेमंडळींना फैलावर घेतलं. तर महापौर राजेंद्र देवळेकरांनी पालिका प्रशासनाला सज्जड दम दिला. प्रशासनानं मात्र, शक्य तितक्या लवकर खड्डे भरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महापौरांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर तरी पालिका प्रशासन खड्डे बुजवण्याचं काम जलद गतीनं करणार का? याकडेच नागरिकांकडे लक्ष लागून राहिलं आहे.