कल्याण : उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मोहिनी पॅलेस इमारतीत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकानं होती. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. अक्षरशः पट्ट्यासारखा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, तो थेट जमिनीवर आला. या घटनेनंतर अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. 


या इमारतीतील 17 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं. जखमींना उल्हासनगरच्या सेन्ट्रल रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ व टीडीआरएफने ढिगाऱ्याखाली दबलेल्या 5 जणांना मृतावस्थेत बाहेर काढलं. तर एक जण अजून मलब्याखाली असल्याची माहिती असून त्याचं शोधकार्य सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


मृतांची नावे  



  1. मॉन्टी पराचे -12 वर्ष 

  2. संध्या डोटवालन- 46 वर्ष 

  3. हरेश डोटवाल-  47 वर्ष 

  4. ऐश्वर्या डोटवाल -17 वर्ष 

  5. सावित्रीबाई पारचा - 58 वर्ष


या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची शासकीय मदत दिली जाणार असून जखमींवर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच कमी एफएसआयच्या समस्येमुळे उल्हासनगरात क्लस्टर योजना लागू होऊ शकत नसली, तरी पुनर्विकास आणि नियमितीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिंदेंनी दिली. तर उल्हासनगरातील सर्व धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.