मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या वतीने 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबई प्रभागांमध्ये करण्यात आली आहे.  मात्र, कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरूपात पैशांचे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. 


अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरामधील कंपन्यांमध्ये अश्याच एका मालकाकडून या क्लीन अप मार्शलने मास्क न घातल्यामुळे व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्यात कंपनी मालकाने 21 एप्रिल रोजी दीड लाख ऐवजी 20 हजार रुपयांची खंडणी दिली होती. मात्र, या आरोपीने काल संध्याकाळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये रेड मारून 1 लाखांची खंडणी मागितली. यानंतर कंपनी मालकाने या क्लीनअप मार्शलच्या विरोधात तक्रार करून सर्व प्रकारची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. 


कंपनी मालकाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी 5 क्लीन-अप मार्शलच्या विरोधात गुन्हा नोंद करुन यातील चार क्लीन-अप मार्शलला अटक केली आहे. प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड अशी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या क्लीनअप मार्शलची नावं आहेत. यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे . या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच यांनी आणखी कोणत्याही ठिकाणी अश्या प्रकारे लूट केली आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे, असे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.