मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या अलिबागमधील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर हातोडा चालवण्यात आला आहे. प्रशासनाच्यावतीनं ही माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली, तसेच या पट्ट्यातील अन्य बेकायदेशीर बांधकामांवरही कारवाई सुरू आहे.


सुमारे 61 प्रकरणांत दिवाणी कोर्टानं परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिलेत. तर अन्य 58 बांधकामांना कारवाईची नोटीस बजावलेली आहे आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, अशी हमी हायकोर्टाला देण्यात आली आहे.


बॉलिवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी जमीन विकत घेऊन तेथे बेकायदा बंगले उभारले आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्ये हे बंगले उभारण्यात आले आहेत. याप्रकरणी सुरेंद्र धावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.


अलिबाग किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांवर कारवाई न करताच त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले होते. फरारी व्यापारी नीरव मोदीसह बॉलिवूडमधील कलाकारांच्या अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने हायकोर्टाने महसूल विभागालाही झापले होते.


प्रशासनाने यापूर्वी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अनेकदा मोहीम हाती घेतली. परंतु बंगल्यांच्या मालकांनी न्यायालयात धाव घेत या कारवाईवर स्थगिती मिळवली. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्यास दिरंगाई होत आहे, असं स्पष्टीकरण याआधीच्या सुनावणीत प्रशासनाकडून देण्यात आलं होतं.