Buffalo Milk Price Hike: गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आधीपासूनच महागाईनं (Inflation) हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता ऐन सणासुदीच्या काळात मोठा धक्का बसणार आहे. मुंबईकरांना (Mumbai News) महागाईचा झटका बसणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत म्हशीचं दूध (Buffalo Milk Price) दोन रुपयांनी महागलं आहे. मुंबई दूध उत्पादक संघानं 1 सप्टेंबरपासून मुंबईत म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रतिलिटर 85 रुपयांवरून 87 रुपये प्रतिलिटर होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
दरांमध्ये का करण्यात आलीये वाढ?
मुंबई दूध उत्पादक संघ या सुमारे 700 दुग्धशाळांच्या समुहानं याबाबत शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत चारा आणि जनावरांच्या आहाराच्या वाढत्या किमती पाहता दुधाच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दर शुक्रवारपासून म्हणजेच, 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर मुंबईत म्हशीच्या दुधाच्या किरकोळ दरांत 2 ते 3 लिटरनं वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, घाऊक दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे.
चाऱ्याच्या वाढत्या किमतीमुळे डेअरी मालक चिंतेत
विशेष म्हणजे, मुंबईतील या बैठकीत 700 हून अधिक डेअरी मालक आणि 50 हजारहून अधिक म्हशींचे मालक सहभागी झाले होते. यामध्ये जनावरांच्या चारा आणि आहाराच्या वाढत्या किमतींवर चर्चा करण्यात आली. या संघटनेचे उपाध्यक्ष रमेश दुबे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत जनावरांचा चारा सुमारे 20 टक्क्यांनी महाग झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही दुधाच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा दरांचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांच्या खिशाला चाप
मुंबईत काही दिवसांतच जन्माष्टमी आणि गणेशोत्सव हे सण साजरे होणार आहेत. या काळात घरांमध्ये मिठाई आणि दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढतो. अशा परिस्थितीत सणासुदीच्या आधीच म्हशीच्या दुधाच्या दरांत वाढ झाल्यानं त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. घाऊक दरात वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये किरकोळ बाजारात म्हशीचं दूध 90 ते 95 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :