Sameer Wankhede Likely Transferred From NCB : मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याबाबत अनेक पुरावे सादर केले. शिवाय या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनीही गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. या सर्व प्रकरणात समीर वानखेडे यांची मुंबईत एनसीबी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच अचानक समीर वानखेडे यांनी दिल्लीतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण आणि बॉलिवूडमधील कलाकारांची चौकशीमुळे समीर वानखेडे चर्चेत आले. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली.  त्यातच दिल्लीमधील एनसीबी कार्यालयातून समीर वानखेडे यांना बोलवणं आलं. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली. डीजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (DG narcotics control bureau )यांनी समीर वानखेडे यांच्यावर विभागीय चौकशी लावली आहे. त्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी होत असेल तर त्याला त्या पदावर राहाता येत नाही. जोपर्यंत याचा काही निर्णय येत नाही तोपर्यंत त्या पदावरुन दूर करण्यात येतं. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासापासूनही त्यांना दूर केलं जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


मुंबईतील हायप्रोफाइल ड्रग्ज प्रकरणामुळे दिल्लीतील एनसीबी कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज त्यांनी एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. दिल्लीतील एनसीबी कार्यालयाबाहेर समीर वानखेडे यांचे समर्थकांनी गर्दी केली आहे. पोस्टर घेऊन वानखेडे यांना पाठींबा व्यक्त करत आहेत. नवाब मलिक यांच्यावर आरोप करणारे पोस्टरही कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहेत. 


संबधित बातम्या :


Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा 


मी दिलेला दाखला खराच, समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली : नवाब मलिक


Nawab Malik vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या बदली प्रकरणात अमित शाह कनेक्शन? नवाब मलिकांना मिळालेल्या पत्रात खुलासा