नवी मुंबई : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. कोपरखैरणेमध्ये कबूतर पकडण्याच्या नादात इमारतीवरुन पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
कोपरखैरणेमधील सेक्टर 19 मधील कृष्णाई निवास इमारतीच्या गच्चीवर काही मुलं खेळत होती. त्यांच्यामधील परितोष उबाळे याला कबूतरं पकडण्यची आवड होती. गच्चीवर कबुतर पकडण्याच्या नादात परितोष इमारतीवरुन खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
परितोषचा चौथ्या मजल्यावरुन पडून जागीच मृत्यू झाला. कबूतरं पकडण्यासाठी एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारण्याची सवय परितोषला होती, अशी माहिती मिळते आहे.
परितोषची आई फोर्टिस रुग्णालयात कामाला आहे, तर वडील हैदराबादमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत. त्याच्या मृत्युवेळी त्याचा भाऊ अविनाश आणि उमेश असे दोघं जण घरी होते.