वसई : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड समर कॅम्पसाठी गेलेल्या मुंबईतील 13 वर्षांच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. वसईजवळील सजन येथे सजन नेचर ट्रेन रिसॉर्टमध्ये मुंबईच्या विक्रोळीमधून 120 मुलं समर कॅम्पला आली होती. त्यातील मनन गोगारी या मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला.

मुंबईच्या विक्रोळीमधील तरुण मित्र मंडळाने 1 मे ते 5 मे दरम्यान विद्यार्थ्यांचा समर कॅम्प आयोजित केला होता. या समर कॅम्पसाठी 120 मुलं मुंबईहून विक्रमगडमधील सजन नेचर ट्रेन या रिसॉर्टमध्ये आली होती. 3 मे रोजी 60 मुलांचा ग्रुप सकाळी 11 च्या सुमारास सजन बंधाऱ्यात पोहायला उतरला. 13 वर्षीय मनन पोहता- पोहता खोल पाण्यात बुडाला. त्यावेळी मुलांच्या सुरक्षेतेची योग्य ती काळजी घेण्यात आली नव्हती.

बंधाऱ्यात बुडालेल्या मनन गोगारी या शाळकरी मुलाचा मृतदेह शोधण्याचा स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी खूप प्रयत्न केला. मात्र गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास मननचा मृतदेह सापडला. विक्रमगड पोलिसांनी याप्रकरणी ३०४ अन्वये रिसॉर्टच्या मॅनेजरसह दोघांवर तर समर कॅम्पमधील दोघां आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.