बदलापूरमध्ये रिक्षाचालकांना दिवाळी बोनस!
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 11:39 PM (IST)
बदलापूर: दिवाळीला मिळणारा बोनस हा प्रत्येकासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र आता सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांच्याबरोबरीने रिक्षा चालकांनाही यंदा बोनस मिळाला आहे. बदलापूरमध्ये चक्क रिक्षाचालकांना दिवाळी बोनस मिळाला आहे. हातावर पोट असलेल्या या रिक्षाचालकांनी मोठ्या कल्पकतेनं बोनसचं स्वप्न साकारलं आहे. 13 वर्षापूर्वी आपल्या रोजच्या मिळकतीतून पैसे बाजूला काढून जमलेला पैसा दिवाळी बोनस म्हणून वापरण्याची योजना या रिक्षाचालकांनी आखली. संघटनेच्या या योजनेत 260 रिक्षाचालकांना सहभाग घेतला. या सर्वांना यंदा तब्बल 22 लाख 40 हजार रुपये बोनस स्वरुपात देण्यात आले आहेत. 13 वर्षापूर्वी 18 रिक्षाचालकांनी या योजनेत भाग घेतला होता. वर्षांगणिक या योजनेचे फायदे लक्षात आल्याने रिक्षा चालकांची संख्या वाढत गेली. प्रत्येकजण दररोज संघटनेकडे ठराविक रक्कम जमा करतो. त्याचा नीट हिशेब ठेऊन वर्षाअखेरीस बोनस म्हणून ती रक्कम दिली जाते. तसंच जमा होणाऱ्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी प्रत्येकाला भेटवस्तूही देण्यात येते.