मुंबई : जन्मदात्या आईला दररोज मारझोड करुन तिचा मानसिक छळ करणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने घराबाहेर काढलं आहे. 72 वर्षीय आईला त्रास देणारा मुलगा घरावर हक्क गाजवू शकत नाही. तसेच अशा मुलाला घरात प्रवेश करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दात सुनावत हायकोर्टानं याचिकाकर्त्याला चांगलाच दणका दिला. संबधित मुलाला घर कायमचे सोडून जाण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.


दक्षिण मुंबईतील याचिकाकर्त्यानं आपल्या आईच्या घरात प्रवेश मिळावा, तसेच तिथं राहता यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी घेण्यात आली.

पत्नी आणि मुलासोबत आपण घराबाहेर गेलो असताना आईने घराचे कुलूप बदलले आणि आपल्याला घराबाहेर हाकलून दिले, असा दावा मुलाने याचिकेत केला होता. आपणास आईने मालमत्तेतूनही बेदखल केल्याचे त्याने हायकोर्टाला सांगितले.

क्षिण मुंबईतील त्यांचं राहतं घर हे त्यांच्या मयत पतीचं व आपल्या मालकीचं आहे, असं पेशाने डॉक्टर असलेल्या वृद्ध महिलेने या सुनावणी दरम्यान कोर्टाला सांगितलं. त्या मालमेत्तवर इतर कोणाचाही अधिकार नाही. मुलाकडून तसेच सुनेकडून अत्याचार होत असल्यामुळे आपल्या बचावासाठी घराचे कुलूप बदलले असल्याचंही वृद्धेने यावेळी हायकोर्टाला सांगितले.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत त्यावर न्यायमूर्ती काथावाला यांनी याचिकाकर्त्या मुलाला चांगलेच खडसावले. तसेच आईच्या मालकीच्या घरातून ताबडतोब निघून जाण्याचे आदेश दिले.

मुलाच्या आणि सुनेच्या जाचापासून संरक्षण व्हावे यासाठी आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे, या वृद्ध महिलेच्या मागणीनुसार हायकोर्टानं मलबार हिल पोलिसांना तिला संरक्षण आणि सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत.