भुजबळांची शेवटची संधी हुकली, हायकोर्टाने जामीन नाकारला
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 14 Dec 2016 11:18 AM (IST)
मुंबई: बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची याचिका आणि जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे छगन भुजबळ कारागृहातच राहणार आहेत. याआधीही भुजबळांनी कोर्टाकडे अनेकदा अपिल केलं होतं. मात्र हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी होती. ती संधीही हुकली आहे. त्यामुळे आता भुजबळांना जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागणार आहे. भुजबळांची याचिका आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अटक करुन हा खटला चालवला जात आहे, अशी याचिका भुजबळांनी केली होती. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे लवकरात लवकर जामीन मिळावा अशी मागणीही भुजबळांकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी मान्य करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक? दरम्यान,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जेजे रुग्णालयात लेटेस्ट फोटो एबीपी माझाच्या हाती लागला. दाढी पांढरी झालेले भुजबळ या फोटोमध्ये चालताना दिसताहेत. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे भुजबळ सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. तिथे अँजिओग्राफी करून घेण्यास भुजबळांनी नकार दिलाय. भुजबळांना अटक पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तब्बल 11 तासांपासून छगन भुजबळांची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती. भुजबळांच्या ‘या’ व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण! ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे.