Maharashtra Rajya Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यास हायकोर्टाने (Bombay High Court) नकार दिला आहे. मात्र नवी कार्यकारणी पुढील सुनावणीपर्यंत जाहीर करु नका असे निर्देश राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला दिले आहेत. अचानकपणे ही संघटना बरखास्त करण्याचा राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचा निर्णय हा नैसर्गिक न्यायाला अनुसरुन नाही, असं मत व्यक्त करत बाळासाहेब लांडगे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर यावर शुक्रवारी (29 जुलै) सुनावणी पार पडली.


महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणी तातडीने बरखास्त करुन नव्याने तातडीने कमिटी नियुक्त करण्याच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संघाचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी अ‍ॅड. संजीव कदम आणि अ‍ॅड. अक्षय कपाडिया यांच्यावतीने याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय कुस्तीगीर संघाने 30 जूनच्या बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तीन सदस्यांची तात्पुरती कमिटी नियुक्त केली. या काळजीवाहू कमिटीने तातडीने निवडणूक जाहीर करुन बिनविरोध कमिटी जाहीर केली होती.


महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये नव्याने लागलेल्या निवडणुकीचा निकाल हा 31 जुलैला लागणार होता. यासाठी 22 तारखेला नामांकन दाखल करण्यात आलं होतं. अध्यक्षपदासाठी नामांकन भरलेल्या तीन अर्जापैकी धावलसिंग मोहिते पाटील आणि काका पवार यांनी दोघांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. यात अध्यक्षपद हे आपोआप भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या पदरात पडले. पण हे होत असताना नक्कीच राजकीय खेळी झाली आहे, कारण संघटनेच्या सचिवपदी आता काका पवार तर कार्याध्यक्ष पद हे धवलसिंग मोहिते-पाटील यांना देण्यात आलं आहे.


याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. संजीव कदम यांनी राष्टीय कुस्तीगीर संघाच्या निर्णयालाच जोरदार आक्षेप घेतला. अशाप्रकारे संघ बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार राष्ट्रीय संघाला नाही, असा दावा करुन राष्ट्रीय संघाची घटनाच न्यायालयात सादर केली. राष्ट्रीय संघटनेने कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देत रितसर सुनावणी घेणं अपेक्षित होतं. मात्र राष्ट्रीय संघटनेने बेकायदा आणि मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रीय संघटनेने कार्यभार सांभाळण्यासाठी बनवलेल्या त्रिसदस्यीय कमिटीने केवळ निवडणुकीचा फार्स तयार करुन बिनविरोध आपलीच नवी कार्यकारणी जाहीर केली आहे, याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं. 


कुस्तीगीर परिषदेतलं राजकरण 
राज्यात सत्ताबदल होताच गेल्या अनेक दशकांपासून राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेल्या शरद पवार यांना या बरखास्तीमुळे धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे आहे. यातच आता भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यात शरद पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. यातच त्याचा कारभार सांभाळणारे बाळासाहेब लांडगे हे मागील 40 वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिव पदावर होते. पण त्यांच्या कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. अनेकदा इतर पदाधिकरी यांनी तक्रारी करुन सुद्धा काहीच होत नसल्याने तसेच भारतीय कुस्तीगीर संघाने घ्यायला लावलेल्या स्पर्धाचे आयोजन होत नसल्याचा ठपका ठेवत भारतीय कुस्तीगीर संघाने करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.


संबंधित बातमी


Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध; रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड