Dilip Kumar Pali Hill Bungalow : दिवंगत बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचा पाली हिल या ठिकाणी असलेला बंगला आता पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आलिशान असे म्युझिअम आणि रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट (luxury residential project) उभारण्यात येणार आहे. दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी रिअॅलिटी डेव्हलपर असलेल्या अशर ग्रुपसोबत (Ashar Group) यासंबंधिचा करार केला आहे. या आलिशान प्रोजेक्टमधून तब्बल 900 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बॉलीवूडचे दिग्गज आणि ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल बंगला आता 11 मजली आलिशान निवासी प्रकल्पात रूपांतरित होणार आहे. या ठिकाणी दिलीप कुमार यांच्या स्मरणार्थ एक म्युझियमही उभारण्यात येणार आहे.
दिलीप कुमार यांचा पाली हिलमधील बंगला हा सुमारे अर्धा एकर परिसरात पसरलेला आहे. याचे बांधकाम क्षेत्र 1.75 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. या ठिकाणी आता आलिशान निवासी प्रकल्प उभारण्यात येणार असून सर्वात खालच्या फ्लोअरला दिलीप कुमार यांचे म्युझियम उभारण्यात येणार आहे.
दिलीप कुमार यांचा हा पाली हिल भूखंड गेली अनेक वर्षे कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. एका बिल्डरने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून या ही जागा हडपण्याचा प्रकारही समोर आला होता. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो (Dilip Kumar Wife Saira Banu) यांनी त्या बिल्डर विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
निवासी प्रकल्पाव्यतिरिक्त दिलीप कुमार संग्रहालय
दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या बंगल्याचे आता 11 मजली आलिशान निवासी प्रकल्प आणि म्युझियममध्ये रुपांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दोघांचे प्रवेशद्वार वेगवेगळे असतील. न्यू जहा या रेडेंशियल प्रकल्पातून सुमारे 900 कोटींहून अधिक रुपयांचा महसूल मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या या जागेची किंमत ही 250 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय.
1953 साली खरेदी केला होता बंगला
अभिनेते दिलीप कुमार यांनी हा बंगला 1953 मध्ये कमरुद्दीन लतीफ नावाच्या व्यक्तीकडून सुमारे 1.4 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा बंगला ज्या भूखंडावर बांधला आहे तो भूखंड कमरुद्दीन लतीफ यांनी 1923 मध्ये मुलराज खतायू नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतला होता.
दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झालं होतं. तेव्हा ते 98 वर्षांचे होते.