ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2017 09:17 AM (IST)
कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे : ऐन वीकेन्डला ठाणे-नवी मुंबई परिसरातील प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. एकीकडे हार्बर मार्गावर रेल्वेचा जंबो ब्लॉक असताना नवी मुंबई-ठाणे रस्त्याचंही काम सुरु असल्यामुळे पुढचे चार दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पर्यायी मार्ग म्हणून पटणी-ऐरोली रोडने ऐरोली नॉलेज पार्क मार्गे आणि ऐरोली जंक्शन येथून पूर्व द्रुतगती महामार्गावर जाता येईल. या बंदीच्या अधिसूचनेत, पोलिस वाहनं, रुग्णवाहिका, फायरब्रिगेड, अत्यावश्यक सेवेतील तसंच या पुलाच्या कामातील वाहनांना लागू राहणार नसल्याचं ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं.