मुंबई : अतिधोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील दहा पुलांवर लवकरच महापालिकेचा हातोडा पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येणारे 10 धोकादायक पूल पाडून नवे पूल बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


वेगवेगळ्या ठिकाणचे पूल पाडल्यानंतर मुंबईतील वाहतुकीचे तीनतेरा वाजणार आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने काय काळजी घेतली जाते, तेही पाहणं महत्त्वाचं असेल. दोन फूटओव्हर ब्रीजही धोकादायक असल्याने पाडले जातील. लवकरच पुलांच्या तोडकामास सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पादचारी भाग पडल्यानंतर महापालिकेला जाग आली. त्यानंतर शहरातील पुलांचा आढावा घेण्यात आला. बीएमसीने केलेल्या एकूण 296 पुलांच्या संरचनात्मक पाहणी अहवालातून धोकादायक पुलांची माहिती उघड झाली होती.

कोणकोणते पूल तोडले जाणार?

  1. गोरेगाव पूर्व- वालभाट नाल्यावरील पूल

  2. मालाड- गांधी नगर, टेकडी कुरार व्हिलेज जवळील पूल

  3. दहिसर- एसबीआय कॉलनीजवळील पूल

  4. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड वरील पूल

  5. कांदिवली पूर्व, बिहारी टेकडीजवळील पूल

  6. कांदिवली पश्चिम - इराणी वाडीजवळील पूल

  7. कांदीवली- एस.व्ही.पी रोड, कृष्णकुंज बिल्डिंग जवळील पूल

  8. कांदीवली- आकुर्ली रोडवरील पूल

  9. साकीनाका, हरी मस्जिद नाला, खैरानी रोडवरील पूल

  10. घाटकोपर पश्चिम, एल.बी.एस मार्ग, चिराग नगरचा पूल


या व्यतिरिक्त, 178 पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये 48 पुलांची तातडीने महत्वपूर्ण दुरूस्ती केली जाणार आहे. तर 77 पुलांची किरकोळ दुरूस्ती केली जाईल. 87 पूल बऱ्या स्थितीत असले तरी त्याची थोडी दुरुस्ती केली जाईल. यामध्ये रंगरंगोटी, फुटपाथ दुरुस्ती अशा कामांचा समावेश असेल.