मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्ता धारकांकडे मिळून 267 कोटी 88 लाख रुपयांचा मूळ कर तर 87 कोटी 31 लाख रुपयांचा दंड अशी एकूण 355 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. त्यामुळे या संपूर्ण रकमेच्या वसुलीसाठी या 67 थकबाकीदारांच्या इतर स्थावर मालमत्ता आणि गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मालमत्ता कर हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई करण्यात येते. महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास 21 दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई महानगरपालिका प्रशासनाकडून केली जाते.
थकबाकीदारांच्या नावे नोंदणीकृत व्यवहार केलेल्या स्थावर मालमत्तांचा शोध घेणे, त्या नोंदणीकृत मालमत्तांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे गोळा करणे, थकबाकीदारांचे हितसंबंध आणि संचालक पद आहे, अशा व्यावसायिक संस्थांचा शोध घेणे, त्या संस्थांमध्ये थकबाकीदाराची गुंतवणूक आणि आर्थिक हितसंबंध स्थापित करणे, थकबाकीदारांच्या मालमत्तेवरील बोजा शोधण्याकामी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शोध घेणे आदी कामे या व्यावसायिक संस्थेमार्फत करुन घेण्यात येणार आहेत.
आपल्या मालमत्ता कराचे अधिदान महानगरपालिका प्रशासनाकडे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत करावे, असे आवाहन मुंबईकर नागरिकांना करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: